Friday, July 22, 2011

वाणी

      श्रद्धावानांनो, आपलं जीवन रसमय करण्यासाठी, जीवंत ठेवण्यासाठी, चैतन्यमय ठेवण्यासाठी जीभेचा वापर नीट करूया आणि वाणीचा वापर परमेश्वराच्या नामस्मरणासाठी करून जीवनात परमेश्वराची प्राणप्रतिष्ठा करूया.
 
 वाणी      
      वाणी म्हणजे मी जे बोलतो ते. वाणीचा स्वामी आहे सदगुरू महाविष्णू. मनुष्य इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरला तो त्याच्या बुद्धिमत्तेमुळे आणि त्याच्या वाणीमुळे. आम्ही जे बोलतो तीच फक्त वाणी आहे का? नाही, तर आम्ही जे लिहितो ते आणि लिहिलेले बोलतो ती ही वाणीच, मात्र मूळ वाणी त्या परमेश्वराने दिली ती जन्मजात आहे परमेश्वराने दिलेल्या कर्मस्वातंत्र्यामुळे मनुष्य आपल्या मातृभाषेबरोबर अन्य भाषाही शिकतो.
      माझी वाणी मला माझी सिद्धता प्राप्त करून देणारी सगळ्यात मोठ साधन आहे. माझा अभ्यास माझ्या लिहिण्यातून, ऐकण्यातून किंवा बोलण्यातून चालतो. मात्र, ह्याचा वापर कसा करायचा हे माझ्या स्वतः वर अवलंबून असते.
      जीभ जशी बोलते तशी ती रसना पण आहे. माझी जीभ म्हणजे वाक्ज्ञानेन्द्रीय म्हणून ती चव चाखण्याचे काम करते. तर, कर्मेंद्रिय म्हणून ती बोलण्याचे काम करते. त्या वाणीला ऋषींनी ओळखलं.
      वाणी दोन प्रकारच्या तेजांनी बनलेली आहे. ती तेज कुठली? तर, प्राणमय तेज आणि रसमय तेज. म्हणजेच वाणीमध्ये प्राण आहेत व रस ही आहे. आपल्या बोलण्यामध्ये जिवंतपणा असावा लागतो, चैतन्य असाव लागतं. कारण चैतन्य असल्याशिवाय रस उत्पन्न होत नाही आणि रसोत्पत्तीशिवाय जिवंतपणा नाही.
      माझ्या जीभेमध्ये कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय ह्या दोघांचाही मिलाप होतो म्हणून मला वाणीचा वापर नीट करता आला पाहिजे. दुसरयाची निंदा नालस्ती करताना जिवंतपणा असेल पण त्यात रसमयता नाही. कोणाबद्दल बोलायचे असेल तर चांगल्या व्यक्तीबद्दल बोलले पाहिजे. स्वतःच्या फायद्यासाठी वाईट व्यक्तीचे गोडवे गाणे चुकीचे आहे. 
       जीभ हे कर्मेंद्रिय व ज्ञानेंद्रिय असल्यामुळे आणि प्राण आणि रस एकत्र असल्यामुळे ती मला परमेश्वराशी जोडणारी वाणी आहे व तेच माझे परमेश्वराशी जोडणारे महत्वाचे साधन आहे. कारण, परमेश्वरही प्राणमय आणि रसमय आहे. मी परमेश्वराला साद घालतो, "देवा धाव!" त्यावेळी मला परमेश्वराशी जोडत कोण? तर वाणी, हे मला नीट ध्यानात ठेवलं पाहिजे.
      नाम घेताना एवढंच ज्ञान असायला पाहिजे कि, मी माझ्या सदगुरूच नाव घेतोय, ते नाम सदगुरूंनी सांगितले आहे. जेव्हा हा भाव मी मनात धरतो तेव्हा, नामातून रसमयता ही प्रवाहित होते.
      राम कृष्ण हरी आणि राम कृष्ण गोविंद ह्यात फरक काय? काहीच नाही. राम कृष्ण हरी म्हणजे कृतीकडून ज्ञानाकडे जाणारा मार्ग. तर, राम कृष्ण गोविंद म्हणजे ज्ञानाकडून कृतीकडे जाणारा मार्ग. ही दोन्ही नाव प्राणमय व रसमय आहेत, पण कशी? तर, जेव्हा मला पूर्ण विश्वास अहिये कि हे नाम माझ्या भगवन्ताच आहे, तेव्हाच. आणि हा विश्वास म्हणजे देवाची प्राणप्रतिष्ठा.
      देवाची  प्राणप्रतिष्ठा कशी करायची? प्राणप्रतिष्ठा, म्हणजे देवाच्या मूर्तीची स्थापना. पण कशी? तर ही केवळ देवाची मूर्ती नसून हा साक्षात माझा देवच आहे असा विश्वास धारण करणे म्हणजे परमात्म्याची प्राणप्रतिष्ठा. म्हणजेच देवाचे प्राण अशा पद्धतीने केलेल्या प्राणप्रतिष्ठेमध्ये प्राणमयता आणि रसमयता दोन्ही आहेतच. कारण, हा वाणीचा ईश्वर आहे हा वाकइंद्रियाचा ईश्वर आहे म्हणून तो वाग्मि आहे.
      प्राण आणि रस एकमेकांशी कश्याने बांधले गेले आहेत? यावर शौनक ऋषी उत्तर देतात की, प्राण आणि रस सत्य आणि विश्वास ह्या दोन बंधांनी बांधले गेले आहेत, सत्य आणि विश्वास ह्या दोन गोष्टी परस्पर पूरक असून ह्या वेगळ्या केल्या तर त्या संदर्भहीन होतील.
      परमेश्वर आहे हे सत्य आहे. ते आम्हाला मान्य आहे. पण त्या सत्याचं रुपांतर विश्वासात झाल नाही तर काय उपयोग? म्हणून परमात्म्याने मला जी वाणी दिलेली आहे. ती प्राणमय आणि रसमय आहे. ह्या दोन्हीचा वापर करून मला माझ्या जीवनामध्ये प्रत्येक कृतीत प्राण आणि रस उत्पन्न करायला पाहिजे. 
       भाऊबीजेला भाऊ घरी येणार म्हणून बहिण आपल्या भावाला आवडेल ते पदार्थ करते ही कृती प्राणमय व रसमय आहे. आमची प्रत्येक कृती प्राणमय व रसमयपाहिजे नाहीतर जीवनातली कुठलीही कृती पूर्ण होऊ शकत नाही. जिथे रस आहे तिथे प्राण आहे व जिथे प्राण आहे तिथे रस आहे.
      मी जेव्हा परमेश्वरच्या नामामध्ये तल्लीन होतो तेव्हा माझ्या शरीराच्या प्रत्येक भागामध्ये ते नाम प्राण उत्पन्न करते आणि रसपण उत्पन्न करते. जिथे गरज आहे तिथे उत्पन्न करते . मात्र, मी भोंदू गोसावाड्याच नाम घेऊन चालणार नाही. सदगुरूच ( परमात्म्याच ) नामाच प्राण व रसमयता निर्माण करू शकते.
      आम्ही आमच्या जीभेचा वापर कसा करायचा? जीभेद्वारे निघणारी वाणी ही वाकवाणी आहे. जिभेची अधिष्टात्री देवता सरस्वती आहे. रसवती म्हणजे रस आणि चैतन्य दोन्ही, आमच जीवन जर आम्हाला रसमय करायचं असेल जीवंत ठेवायचं असेल, चैतन्यमय ठेवायचं असेल तर ह्या जीभेचा वापर नीट करता आला पाहिजे. जीभेचा वापर चांगल बोलण्यासाठी केला पाहिजे. सदगुरूंचे गुणसंकीर्तन करण्यासाठी सदगुरुचे नामसंकीर्तन करण्यासाठी केला पाहिजे. नामस्मरण पूर्ण विश्वासाने प्रेमाने करणे गरजेचे आहे. प्राणप्रतिष्ठा फक्त मूर्तीतच का? ती माझ्या वाणीतही झाली पाहिजे. मग ती जी सरस्वती आहे जिभेची अधिष्टात्री देवता आहे. माझ्या वाणीची उदगाती आहे. ती माझ्या प्रत्येक उचित कृतीला रसपणा आणि चैतन्य देणारच.
      हे सर्व घडून यावे म्हणून माझ्या मनाचा व बुद्धीचा स्वामी असलेला. महाप्राणाचा प्राण असलेला, सर्व रसांचा रसराज असलेल्या व वाणीचा स्वामी असलेल्या सदगुरु श्री अनिरुद्धांना प्रार्थना करूया की,

"हे अनिरुद्धराया, माझ्या जिभेतुन प्राणमयता व रसमयता निर्माण करणारी वाणीच निघू दे. जी वाणी तुझ्या नामाची, तुझ्या गुणांची व तू घालून दिलेल्या आदर्शांचे आचरण करील."
आधार - सदगुरू श्री अनिरुद्ध प्रवचन.




Source- Shri Gurukshetram Patrika ( Shri Airuddha Gurukshetram)

No comments:

Post a Comment